'त्या' फोनमुळे उडाली पुणे रेल्वे पोलिसांची झोप
कर्नाटक पोलिसांचा पुणे रेल्वे पोलिसांना फोन... पुणे रेल्वे स्थानकावर घातपात होण्याची शक्यता... रेल्वे पोलिसांची दोन दिवस धावपळ... स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म, सर्व प्रवाशांची कसून तपासणी... श्वान पथक, बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण... शेवटी पुन्हा कर्नाटक पोलिसांचा फोन... ही अफवा आहे, आम्हाला फोन करून खोटी माहिती देणाऱ्याला पकडले आहे.
कर्नाटक पोलिसांना एका अज्ञात व्यक्तिने फोन करून देशातील काही रेल्वे स्थानाकांवर बॉम्ब स्फोट होणार असल्याची माहिती दिली. यामध्ये रेल्वे स्थानकांमध्ये पुणे रेल्वे स्थानाकाचाही समावेश असल्याचे या व्यक्तीने सांगितले होते. कर्नाटक पोलिसांनी तत्काळ राज्य रेल्वे पोलिसांना फोनद्वारे ही माहिती कळविली. ही माहिती कळताच रेल्वे पोलिस, पुणे शहर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील बंदोबस्त वाढविला. विशेषत: पुणे रेल्वे स्थानकावरील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली. रेल्वे पोलिस आणि शहर पोलिस यांची श्वान पथके, तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी करण्यात आली. तसेच सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असल्याने पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात होती. हा प्रकार शनिवारी दुपारपर्यंत सुरू होता. शनिवारी दुपारी पुन्हा रेल्वे पोलिसांचा कर्नाटक पोलिसांचा फोन आला. 'पुणे रेल्वे स्थानकावर घातपात होणार, बॉम्ब स्फोट होणार, ही अफवा आहे. आम्हाला एका ट्रक चालकाने फोन करून खोटी माहिती दिली होती. त्याला बेंगळुरू येथे अटक केली आहे,' असा निरोप कर्नाटक पोलिसांनी दिला. त्यानंतर पुणे रेल्वे पोलिस, शहर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.