ऐतिहासिक निर्णय! राज्यातील शासकीय वसतिगृहांना ‘महापुरुषांची’ नावे
राज्याच्या सामाजिक न्याय व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील एकूण ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांमध्ये बदल करून मुलांच्या वसतिगृहांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह तर मुलींच्या वसतिगृहांना सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या सर्व वसतिगृहांनाही हीच नावे देण्यात येणार आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय अधिकृतरित्या निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मसन्मान आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
महापुरुषांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत शिक्षणाच्या प्रवासाला नवी दिशा देणारा हा निर्णय समाजातील वंचित घटकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.