नवी मुंबईत ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव लोककलेचा जल्लोष अनुभवण्याची सुवर्णसंधी!
नवी मुंबईकरांसाठी पारंपरिक लोककलेचा अद्भुत सोहळा अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ९ मार्च ते १३ मार्च २०२६ या कालावधीत भव्य ‘ढोलकीफड तमाशा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात राज्यभरातील विविध नामांकित लोकनाट्य तमाशा मंडळे सहभागी होणार असून पारंपरिक तमाशा, लावणी आणि ढोलकीफड कलाप्रकारांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची झलक या महोत्सवातून पाहायला मिळणार आहे.
हा रंगतदार सांस्कृतिक सोहळा दररोज सायंकाळी ६.३० वाजता सिडको सेक्टर ५, गावदेवी मैदान, सानपाडा, नवी मुंबई येथे होणार असून रसिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
लोककलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा महोत्सव नवी मुंबईतील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करणारा ठरणार असून लोककलेचा हा जल्लोष अनुभवण्यासाठी रसिकांची उत्सुकता वाढली आहे.