धारावीचा पुनर्विकास आणखी रखडणार?
वर्षानुवर्षे रखडलेला धारावीचा पुनर्विकास आणखीनच रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावा यासाठी राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी आठशे कोटी रुपयांची मागणी म्हाडाकडे केली होती. मात्र यास म्हाडातील कामगार संघटनेने विरोध दर्शवला होता. हा निधी अद्याप देण्यात न आल्याने हा प्रकल्प आणखीनच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वीच राज्य सरकारने म्हाडाकडून १ हजार ५०५ कोटी रुपये घेतले आहेत. म्हाडाकडे दोन हजार कोटी रुपये शिल्लक असून त्यातील १ हजार ८०० कोटी रुपयांची रक्कम प्राप्तिकर विभागास देण्यावरून प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे म्हाडाकडील निधी अन्यत्र वळवल्यास सर्व योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. यामुळे संघटनांनी विरोध दर्शवला होता. अद्याप ही प्रक्रिया पुढे न सरकल्याने हा प्रकल्प आणखीनच रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.