बंटी-बबली’ची रुमालचलाखी
अॅन्टॉप हिल येथे राहणाऱ्या मनी अन्नामलाई (५५) यांचा संगम नगरमध्ये फळविक्रीचा व्यवसाय आहे. मनी यांचे पती जवळच असलेल्या मद्रासी मंदिरात पुजारी आहेत. त्यांच्या स्टॉलवर गेल्या काही दिवसांपासून एक पती-पत्नी फळे घेण्यासाठी नियमित येत. संदीप नाव सांगणाऱ्या या व्यक्तीशी मनी यांचा परिचय वाढला. ३० एप्रिल रोजी मनी या नवी मुंबईहून लोकलने जी.टी.बी. नगर स्थानकात उतरल्या. येथून घरी जात असताना त्यांना संदीप आणि त्याची पत्नी भेटली. उन्हाने घामाघूम झालेल्या मनी यांचे तोंड पुसण्यासाठी या दोघांनी रुमाल पुढे केला. रुमालाने तोंड पुसल्यानंतर आपण काय करतोय याचे भान मनी यांना राहिले नाही. त्यांनी अंगावरील मंगळसूत्र, तीन सोन्याच्या साखळ्या, एक ब्रेसलेट, कर्णफुले, तीन हजारांची रोकड असा सुमारे पाच लाखांचा ऐवज संदीप आणि त्याच्या पत्नीकडे दिला. ज्यावेळी मनी भानावर आल्या त्यावळेही हे दोघेही गायब होते आणि दागिनेही गेले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनी यांनी पतीसोबत जाऊन अॅन्टॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली. मनी यांनी दिलेले वर्णन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस या 'बंटी-बबली'चा शोध घेत आहेत