गोळीबारप्रकरणी फिर्यादीच निघाला आरोपी
भिवंडी : तालुक्यातील रांजनोलीनाका येथील स्वीट हार्ट आॅर्केस्ट्रा बारचे चालक अमोल बोराडे यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी कोनगाव पोलिसांनी इंदूर येथून दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीत गोळीबाराच्या कटाचा सूत्रधार खुद्द बारचालक अमोल असून त्याने कर्जदारांचा ससेमिरा चुकवण्यासाठी केलेला कट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
२८ मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास अमोल बारच्या मागील बाजूस सिगारेट ओढत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करत जखमी केले होते. याबाबत, कोनगाव पोलीस ठाण्यात अमोल याने तक्रार दिली होती. दरम्यान, इंदूर येथून तालुक्यातील कांदळी गावातील रहिवासी कपिल कथोरे व इरफान शेख यांना गावठी कट्ट्यासह अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोनगाव पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्या तपासात आरोपींच्या फिर्यादीसोबत झालेल्या संभाषणातून गुन्ह्यातून फिर्यादी आरोपींना सोडवण्यासाठी मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी अमोल याच्याकडे मोर्चा वळवला असता त्याने गोळीबाराचे नाटक रचल्याचे स्पष्ट झाले.