ऐन गर्दीच्या वेळी 'लोकल खोळंबा'; मध्य रेल्वे ४० मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेचे कल्याणहून मुबईकडे येणारी वाहतूक ४० मिनिटे उशिराने होत असून ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
डोंबिवलीहून आज सकाळी ८.४१ वाजताची सीएसएमटीच्या दिशेने सुटणारी लोकल ९.१० वाजता स्थानकात पोहोचली. तसंच डोंबिवलीला ८.४२ वाजता येणारी कल्याण लोकल अजूनही आलेली नसल्याचे प्रवासी सांगतात. मध्य रेल्वेवरील डाउन मार्गावरील लोकल वाहतूकही ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे वृत्त आहे.
या बरोबरच आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानंतर रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. काल मान्सूनपूर्व पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आजही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना सलग दुसऱ्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.