नाल्यात कचरा टाकणाऱ्यांकडून दंडवसुली
नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून मागील आठ दिवसांत तब्बल तीन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई करताना नाल्यालगतच्या कोणत्या भागातून कचरा टाकण्यात आला आहे, याचा शोध घेण्यासाठी नाल्यांमध्ये विशिष्ट अंतरानंतर 'ग्रील' बसवण्याची कार्यवाही सध्या प्रगतीपथावर आहे.
नाल्यांमध्ये कचरा टाकला जाऊ नये व सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता असावी, यासाठी पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये पोलिसांचाही समावेश असून कचरा टाकणाऱ्यांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ नुसार तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. सर्वाधिक म्हणजे रुपये ९३ हजार दंडवसुली ही एम पूर्व विभागात मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर परिसरात करण्यात आली आहे. या खालोखाल जी दक्षिण विभागातून वरळी, लोअर परळ, वरळी कोळीवाडा, प्रेम नगर, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग भागातून ३२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला; तर एल विभाग कुर्लामधून ३० हजार, आर दक्षिण कांदिवलीमधून २४ हजार दंडवसुली करण्यात आली आहे.
कचरा टाकणाऱ्या व्यक्तीसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये दंड आकारला जात असून स्वच्छतेसाठी जनजागृती व्हावी म्हणून ठिकठिकाणी फलकदेखील बसवण्यात येत आहे. तसेच लोकप्रतिनिधींसमवेत बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. नाल्यांमध्ये ठराविक अंतरावर 'ग्रील' बसवण्यात येत आहेत. सफाई करूनही यापैकी ज्या ग्रीलमध्ये पुन्हा कचरा आढळून येईल, त्या भागात पथकाची गस्त वाढवली जाईल. तसेच लगतच्या परिसरातील संबंधितांकडून दंडवसुली करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.