धारावीच्या जागेवर ‘बीकेसी’सारखे संकुल!
मुंबई
: धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासात तातडीने पुनर्वसन करण्यासाठी मोकळ्या जागेचा मोठा प्रश्न येत होता. आता राज्य सरकारने धारावीच्या शेजारचा ४५ एकरचा रेल्वेचा भूखंड केंद्र सरकारच्या परवानगीने पुनर्वसनाच्या इमारती उभारण्यासाठी ८०० कोटी रुपयांना विकत घेतला असून धारावीतील लोकांसाठी त्यावर इमारती बांधल्या जातील. धारावीच्या जागेवर वांद्रे-कुर्ला संकुलासारखे दुसरे व्यावसायिक संकुल उभे राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच महाधिवक्त्यांचे मत घेऊन धारावी प्रकल्पासाठी फेरनिविदेबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या सरकारमध्ये ज्या प्रकल्पांचे काम सुरू होऊ शकले नाही, ते मेट्रो रेल्वे, धारावी प्रकल्प, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू, छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी स्मारक असे अनेक प्रकल्प गेल्या पाच वर्षांत मार्गी लावल्याचा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.