सहा महिन्यांत लोकलवर दगडफेकीच्या 10 घटना, 11 प्रवासी जखमी
मुंब्रा येथे लोकलच्या महिला डब्यावर झालेल्या बीयर बाटलीफेकीत दोन महिला जखमी झाल्याने रेल्वेशेजारील टपोरी गर्दुल्ल्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईत लोकलवर समाजकंटकांकडून दगड मारण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत एकूण 10 घटनांत 11 प्रवासी जखमी झाले आहेत.
घाटकोपर ते कांजूर मार्ग याच भागातून लोकलवर दगडफेकीच्या सहा घटना घडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने दिली आहे. त्यामुळे अशा घटनांवर अंकुश कसा आणायचा, असा प्रश्न पडला आहे. नुकतीच मुंब्रा ते दिवा दरम्यान दारूच्या बाटल्या लोकलमधील महिला डब्यावर फेकल्याने दोन महिला प्रवासी जखमी झाल्या होत्या. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने या भागातील समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्याची शोधमोहीम हाती घेतली आहे.