मुंबई पोलीस २४ तास रस्त्यावर
मुंबई : सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी स्वत:चे कुटुंब मागे सोडून कामावर आलेले मुंबई पोलीस दल गेले दोन दिवस मुसळधार पावसात अहोरात्र रस्त्यावर आहे. मुंबई ठप्प झाली, पाठोपाठ सुट्टी रद्द झाल्याने दोन दिवस बहुतांश पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घराचे तोंड पाहिलेले नाही.
पुढले तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार हा अंदाज गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द केल्या. नियंत्रण कक्षाला सतर्क राहून पावसानिमित्त आलेल्या प्रत्येक तक्रारीचे कमीत कमी वेळेत समाधान करण्याचे, मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. तसेच सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना हद्दीत गस्त वाढवून जिथे कुठे पाणी साचेल, वाचण्याची शक्यता असेल तिथल्या नागरी वस्तीला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी हद्दीतील नेमक्या ठिकाणी बंदोबस्त द्यावा, असेही बजावले.
त्यानुसार रात्रीपासून पोलीस, वाहतूक पोलीस रस्त्यांवर होते. पाणी साचलेल्या ठिकाणी बेरिकेड्स लावून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे, रस्त्यात बंद पडलेली वाहने कडेला घेणे, पाणी शिरलेल्या वस्तीतील राहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, उघडी गटारे, भुयारी जलमय वाहिन्यांची तोंडे, दुथडी भरून वाहणारे नाले आणि साचलेल्या कंबरभर पाण्यातून वाट काढत पुढे जाणाऱ्या पादचाऱ्यांना हात देत इच्छित स्थळी सोडणे आदी कामांत पोलीस दल व्यस्त दिसले.
या गडबडीत सोमवारी रात्री रेल्वे सेवा ठप्प झाली. रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे जोडीदार न आल्याने कामाचे तास संपले तरी आधीचे अधिकारी-कर्मचारी खोळंबले. न आलेल्यांची जबाबदारीही त्यांच्यावरच आली.
वाहतूक पोलिसांनी शहरातील १४५ सखल भागांसाठी आधीच व्यूहरचना आखली होती. या ठिकाणी पाणी साचले तर वाहतूक कोणत्या मार्गाने वळवावी याचा अभ्यास आधीच करण्यात आला होता. वाहतूक वळवण्यासह पाणी साचलेल्या ठिकाणी बेरिकेड्स लावून तेथे वाहने येऊ नयेत यासाठी मनुष्यबळ तैनात केले होते.
रस्त्यांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना पाणी, चहा आणि नाश्त्याची व्यवस्था अनेक पोलीस ठाण्यांतून केली गेली.
मंगळवारी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. सतर्क राहून नागरिकांना सहकार्य, मदत, बचावकार्य करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याने वेळकाळ, वैयक्तिक सबबी न सांगता कर्तव्य बजावले.