वर्गमित्रावर त्याच्याच घरात चोरी करण्यासाठी दबाव?
कामोठे सेक्टर ३४ येथील एका कॉन्व्हेंट शाळेत नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्राला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याला त्याच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. गेल्या दोन वर्षांत अशाप्रकारे या पीडित विद्यार्थ्यांने आपल्या घरातून दोन लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम व ऐवज चोरी केल्याचे समोर आले आहे.
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराचा उलगडा नुकताच झाला. आपल्या मुलाचे वजन सातत्याने कमी होत असल्याची चिंता त्याच्या पालकांना सतावत असतानाच, एके दिवशी त्याच्या वडिलांना त्याच्यावर आणण्यात येत असलेल्या दबावाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्या आधारे या मुलासह त्याच्या शाळेतील अन्य दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोडपाली येथे राहणाऱ्या एका वाहतूकदाराचा मुलगा कामोठेतील एका शाळेत नववी इयत्तेत शिकतो. गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलाचे वजन कमी होत असल्याचे लक्षात आल्याने या वाहतूकदाराने एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू केले. याच दरम्यान वाहतूकदाराच्या पत्नीच्या मोबाइलवर आलेल्या एका फोनवरून ‘मोबाइल का काम हुआ क्या’ असा प्रश्न विचारण्यात आला. मुलाच्या आईने विचारणा केली असता समोरून बोलणाऱ्याने त्यांच्या मुलाचा वर्गमित्र असल्याचे सांगत फोन ठेवून दिला. त्यातच आपल्या घरात ठेवलेली रोकड कमी झाल्याचे या वाहतूकदाराच्या लक्षात आले. त्याने मुलाला विचारले असता, त्याने आपण घराजवळच्या दुकानातून खाऊ घेतल्याचे सांगितले. मात्र, दुकानदाराने याचा इन्कार केला. वडिलांचा संशय बळावल्याने त्यांनी मुलाला दमात घेतले असता, त्याने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. आपल्या वर्गातील दोन मित्र दीड वर्षांपासून आपल्याला पैसे चोरी करण्यासाठी धमकावत असल्याचे या मुलाने वडिलांना सांगितले. गेल्या दहा दिवसांत या मुलाने आपल्याच घरातून ६० ते ७० हजार रुपये चोरून या मुलांना दिल्याचेही उघड झाले. वाहतूकदाराने याबाबत शाळेत जाऊन याबाबत तक्रार केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पाचारण केले. मात्र, त्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यामुळे वाहतूकदाराने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.