खड्डय़ामुळे पोलिसाचा मृत्यू
अंबरनाथ येथील महात्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना पोलीस कर्मचारी संजीव पाटील यांना कल्याण-बदलापूर या राज्य महामार्गावरील खड्डय़ामुळे जीव गमावावा लागला. पाटील यांची दुचाकी खड्डय़ात आदळून घसरली असतानाच मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रस्त्यांवरील खड्डय़ांचे भीषण वास्तव उजेडात आणले आहे. या राज्य महामार्गावर गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांतील हा ३०वा बळी आहे.
ठाणे वाहतूक शाखेच्या अंबरनाथ विभागामध्ये पोलीस कर्मचारी संजीव बन्सीलाल पाटील हे कार्यरत होते. मंगळवारी रात्री ८.४५ वाजता ते फॉरेस्ट नाका येथे कर्तव्यावर होते. त्या वेळेस अंबरनाथ येथील महात्मा गांधी चौकात वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी ते दुचाकी घेऊन निघाले. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरील एका खड्डय़ात त्यांची दुचाकी आदळली आणि त्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडले.
त्याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकची त्यांना धडक बसली. त्यांचे दोन्ही पाय ट्रकच्या चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांच्या शरीरातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. ते अंबरनाथ येथील कानसई भागात राहत होते.
मंगळवारी रात्री झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे अंबरनाथ शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.