हॉर्न वाजवल्याबद्दल एकाची हत्या
दुचाकीचा हॉर्न जोरात वाजवल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये उद्भवलेला वाद विद्याविहारमध्ये एकाच्या जिवावर बेतला. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेत दोन्ही कुटुंबांतील सदस्य जखमी झाले. टिळकनगर पोलिसांनी या सर्वावर गुन्हा दाखल केला आहे.
मनोहर चावरिया (वय ५७) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विद्याविहार येथील मोहन नगर बंजारा वस्ती परिसरात राहत होते. गुरुवारी सकाळी मनोहर चावरीया यांची दोन्ही मुले दीपक आणि मनोज कामानिमित्त दुचाकीवरून बाहेर जाण्यास निघाले. त्यावेळी त्यांनी दुचाकीचा हॉर्न जोरात वाजवला. जवळच उभ्या असलेल्या संदीप पारचा (वय २८) यांना याचा राग
आला. दोघांमध्ये सुरुवातीला शिवीगाळ, बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरण हातघाईवर आले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, ते सोडवण्यास आलेल्या मनोहर यांच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मनोहर यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.