ताजी बातमी

मुंबईः अवघ्या तीनशे रुपयांत मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे दर्शन घडवणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अनेक नामवंत मंडळांच्या नावाचा समावेश आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत जगभरातून गणेशभक्त खास गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबई गाठतात. याचाच गैरफायदा उठवत अनेक बोगस टुरिस्ट कंपन्यांनी आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एका खासगी कंपनीची 'तीनशे रुपयांत गणपती दर्शन' या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार 'लालबागचा राजा'चे मुखदर्शन, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, फोर्टचा राजा, गिरगावचा राजा, अखिल चंदनवाडी, केशवजी नाईक चाळ, खेतवाडीचा गणराज अशा आठ मंडळांच्या गणपतीचे दर्शन घडवले जाणार आहे. तसेच चहा-नाश्ता आणि पाण्याची बाटली भक्तांना दिली जाणार आहे. मात्र या पोस्टबद्दल बहुतांश मंडळांना कल्पनाच नाही. दोन दिवसांपासून फिरणाऱ्या या पोस्टला भुलून किती जणांनी पैसे भरले हेही अस्पष्ट आहे. 

'मंडळाचा आणि सदर पोस्टचा काहीही संबंध नाही. मंडळांसह गणेशभक्तांची फसवणूक चालवली आहे. या पोस्टची माहिती कळताच आम्ही सदर संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. लवकरच याबाबत आम्ही तक्रार दाखल करणार आहोत.' अशी माहिती फोर्टचा राजा मंडळाचे अध्यक्ष नयन डुंबरे यांनी दिली. तर 'मुंबईचा राजा' मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणाले की, 'ही पोस्ट खोटी असून गणेशभक्तांनी यावर विश्वास ठेऊ नये. आम्हीही आमच्या स्तरावर संस्थेचा शोध घेत असून योग्य त्या कारवाईसाठी तक्रार करण्याच्या तयारीत आहोत.' 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात