मोतीलालनगर पुनर्वसन म्हाडाकडूनच
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलालनगर पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही बुधवारी म्हाडा प्राधिकरणाने दिली. मोतीलालनगर एक ते तीनमधील प्रस्तावित पुनर्विकासासाठी काही रहिवासी संस्थांकडून विरोध दर्शविला जात आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाकडूनच हा पुनर्विकास केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी म्हाडाकडून करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासह इतर प्रक्रियांमध्ये रहिवाशांना विश्वासात घेण्याची आग्रही भूमिका रहिवासी संघटनांकडून मांडण्यात आली.
यासंदर्भातील याचिकेवर म्हाडाकडून मोतीलालनगरचा पुनर्विकास व्हावा, असा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. त्या अंमलबजावणीच्या दृष्टीने म्हाडाने पूर्वतयारी सुरू केली आहे. म्हाडाच्या योजनेनुसार येथील १४२ एकर जमिनीवर छोटे शहर उभारले जाईल. सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, तिथे शाळा, उद्याने, रुग्णालय आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील. या प्रकल्पात सुमारे ४० हजार घरे बांधण्याचा म्हाडाचा मानस आहे. मात्र या प्रकल्पास स्थानिक पातळीवर काही प्रमाणात विरोध होत आहे. कॉर्पस फंड, घरांसाठी जास्त जागा अशा मागण्या होत आहेत.
म्हाडाने रहिवाशांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी बुधवारी रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींना पाचारण केले. त्यावेळी रहिवाशांच्या सर्व योग्य मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मोतीलालनगर विकास समितीच्या वतीने युवराज मोहिते यांनी, म्हाडाने रहिवाशांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. रहिवाशांची अचूक संख्या समजण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले. त्याविषयी रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातून विरोध वाढत गेला व सर्वेक्षण थांबवण्यात आले. ही स्थिती लक्षात घेत सर्वेक्षण वा अन्य सर्व प्रक्रियांविषयी रहिवाशांना सुस्पष्ट कल्पना दिल्यास संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असेही मोहिते यांनी सांगितले.