गर्भवतीची डॉक्टरला मारहाण
ठाणे: उपचारादरम्यान शांत राहण्यास सांगणाऱ्या निवासी डॉक्टरलाच गर्भवतीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळवा येथे घडली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या रिंकी यादव या २०वर्षीय महिलेने प्रसूतीपूर्वी निवासी डॉ. धनश्री केळकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान रक्तदाब तपासणी यंत्राचा जबर फटका बसलेल्या डॉ. धनश्री यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रिंकी यादव हिला गुरुवारी सायंकाळी प्रसूतीसाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी महिलेची प्रसूती सिझेरियन पद्धतीने निश्चित करण्यात आली होती. मात्र गुरुवारी रात्रीपासूनच महिलेने रुग्णालयात धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हातावर लावण्यात आलेले सलाइनची सुई वारंवार काढणे, रुग्णालयाच्या आवारात आरडाओरड करत धावपळ करणे यांमुळे तिला डॉक्टरांकडून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. प्रसूतीपूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी तिला कक्षात नेण्यात आले. मात्र त्यावेळीही ती बेडवर बसत नव्हती. प्रसूती कक्षात धावपळ करणाऱ्या रिंकीला डॉ. धनश्री केळकर यांनी समज देऊन तपासणीसाठी झोपण्यास सांगितले. यावेळी संतापलेल्या रिंकूने डॉ. धनश्री यांच्या तोंडावर लाथ मारली. अचानक झालेल्या हल्ल्याने डॉ. धनश्री खाली पडल्या. त्याचवेळी रक्तदाब तपासणीचे मशिन रिंकीने डॉ. धनश्री यांच्या डोक्यात मारले. या आघातामुळे धनश्री यांना भोवळ आली. या गोंधळादरम्यान झालेल्या आवाजाने प्रसूती कक्षातील डॉक्टरांनी तातडीने खोलीत धाव घेत रिंकीच्या तावडीतून धनश्री यांची सुटका केली. याबाबत रिंकी यांच्या विरोधातकळवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉ. धनश्री यांना बेदम मारहाण दिल्यानंतर एकीकडे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार होत असतानाच, दुसरीकडे रिंकी यांची प्रसूती करण्यात आली. आपल्या सहकारीला मारहाण करणाऱ्या रिंकीबाबत डॉक्टरांनी आपले कर्तव्य पार पाडले. मुलगा झाल्याच्या आनंदात यादव कुटुंबीयांनी पेढेही वाटले. मात्र रिंकी यांच्या वागणुकीबाबत यादव कुटुंबीयांना कोणताही पश्चाताप नव्हता.