मोबाइल फोन चोरणाऱ्याला अटक
मध्यरात्रीच्या सुमारास लोकलची वाट पहात रेल्वे स्थानकावर झोपलेल्या तरुणाचा मोबाइल फोन चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दीपककुमार नरेश महातो (१८) या चोरट्याला तुर्भे आरपीएफच्या जवानांनी पाठलाग करून पकडल्याची घटना बुधवारी पहाटे रबाळे रेल्वे स्थानकात घडली. वाशी रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा मोबाइल फोन हस्तगत केला आहे.
तक्रारदार तरुण निजामउद्दीन अली मोहम्मद खान हा गोवंडीतील शिवाजी नगर भागात रहाण्यास असून तो मंगळवारी कामानिमित्त रबाळे येथे आला होता. मात्र त्याला गोवंडी येथे परतण्यासाठी रात्री उशीर झाला. त्यामुळे वाशीच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल निघून गेल्याने निजामुउद्दीन रबाळे रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पहात बसला. त्यातच त्याला झोप लागली. रेल्वे स्थानकावर पहाटे दोनच्या सुमारास आलेला चोर दीपककुमार महातो याने निजामउद्दीन याच्या पॅन्टच्या खिशातील ११ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून पलायन केले. त्यामुळे निजामुद्दीनला जाग आल्याने त्याने आरडाओरडा केला. हा प्रकार रेल्वे स्थानकावर तैनात असलेले आरपीएफचे जवान राध्येशाम आणि राजकुमार या दोघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पळून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी त्याला आरपीएफच्या तुर्भे येथील पोलिस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी केली. त्यानंतर त्याने बाकड्यावर झोपलेल्या प्रवाशाचा मोबाइल फोन चोरल्याची कबुली दिली. तसेच, चोरलेला मोबाइल फोन काढून दिला. त्यानंतर या चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती तुर्भे आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक पी. के. विश्वकर्मा यांनी दिली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी चोर दीपककुमार याला अटक केली आहे.