सुलभ व्यवसाय यादीत भारताचे स्थान उंचावले
मुंबई
: सुलभ व्यवसाय वातावरणाबाबत भारताचे स्थान जागतिक बँकेच्या यादीत १४ने उंचावत ७७ वरून ६३ पर्यंत पोहोचले आहे. नादारी आणि दिवाळखोरी संहिता, अप्रत्यक्ष करप्रणालीसारख्या आर्थिक सुधारणांमुळे देशाचे स्थान याबाबत सलग तिसऱ्यांदा उंचावले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
भारताप्रमाणे यादीत चीन (३१), सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवैत, ताजिकिस्तान, पाकिस्तान (१०८ वे स्थान) यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंड यंदाही अव्वल स्थानीच आहे. तर सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, अमेरिका हे देश पहिल्या १० मध्ये राहिले आहेत. रिझव्र्ह बँक, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आदींमार्फत भारताच्या विकास दराचा चालू वित्त वर्षांसाठीचा अंदाज खाली आणला जात असतानाच गुरुवारी जाहीर झालेल्या भारताच्या सुलभ व्यवसाय वाढत्या क्रमवारीचे उद्योग क्षेत्राने स्वागत केले आहे.
मुंबई महापालिकेने राबविलेल्या ‘ऑनलाईन बांधकाम परवानग्यां’सह अन्य उपक्रमांनी बजावलेल्या महत्त्वाच्या कामगिरीमुळे भारताला अन्य देशांच्या क्रमवारीत वरचे स्थान मिळविण्यात यश आले आहे. जागतिक बँकेने याबाबत अहवालात पालिकेच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
विविध १० प्रगती निर्देशांकांवर आधारित जागतिक बँकेच्या विविध १९० देशांच्या यादीत भारताचे सध्याचे स्थान ७७ व्या क्रमांकावर होते. ते आता १४ ने वर चढत ६३ वर पोहोचले आहे.