एफडीए अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
मिठाईचे उत्पादन घेणाऱ्या नवी मुंबईतील एका कंपनीवर कारवाई न करण्यासाठी १ लाख ४० हजारांची लाच घेणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडलेकर याच्याविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) आरोपीचा शोधही घेतला. मात्र आरोपी सापडला नसून आरोपीच्या घरीही छापा मारला असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली.
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमध्ये तक्रारदार यांचा कारखाना असून या कारखान्यात मिठाई तयार करण्यात येते. मिठाईचे निरीक्षण करून कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी तसेच मागील पाच वर्षे कारवाई केली नाही म्हणून तक्रारदाराकडे पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. एसीबीच्या नवी मुंबई युनिटकडे तक्रारदाराने धाव घेत तक्रार केली. लाचेच्या मागणीविषयी एसीबीने दुसऱ्या दिवशी पडताळणी करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड लाखाची मागणी केली. नंतर तडजोडीअंती १ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले. परंतु आरोपीने लाचेची रक्कम तत्काळ देण्याचा तगादा लावला होता. भ्रष्टाचाराच्या समोर आलेल्या या प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.