पुणे गुन्हे शाखा पथक 3 ची उत्तम कारवाई कोरोना संकटात गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला अटक गुटख्यासह 3.26 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे :- पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना गुटख्याची वाहतूक करणाऱ्या इसमाला पुणे गुन्हे शाखा पथक 3 च्या पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 3 लाख 26 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा पथक 3 च्या पोलिसांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. सर्वत्र बंद असल्याने गुटख्याची तलब असणाऱ्यांचे वांदे झाले. या लोकांची तलब भागवून जादा पैसे कमणाऱ्यांचे छुपे धंदे सुरू होतील, याची पूरेपुर जाणिव असल्याने पुणे पोलीस आयुक्त (भापोसे) डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणे पोलिसांना चोख कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने पोलिसांनी आपापल्या हद्दीत गस्ती वाढवल्या. तस्कऱ्यांची शोधमोहीम सुरू असताना पुणे गुन्हे शाखेच्या पथकाला घोरपडे पेठ परिसरात एक इसम गाडीतून गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून गाडी अडवली. गाडीची झडती घेतली असता त्यात विमल पान मसाला, हिरा गुटखा, सुगंधी तंबाखू आढळून आले. पोलिसांनी सेंट्रो गाडी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव अकिल शकील शेख (28) असे सांगितले. या कारवाईत गुटख्यासर गाडी असा एकूण 3 लाख 26 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.
कोरोना संकटात गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (गु. र.क्र. 429/2020) भादंवि कलम 188, 272, 273 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा कलम 51(ब), कोविड - 19 उपाययोजना नियम कलम 11, संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायदा कलम 3, अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 26(2)(i), 26(2) (iv), सहवाचनक कलम 3(i)(zz) सह कलम 59 नुसार गुन्हा दाखल करून अकिल शेख याला अटक करण्यात आली.
ही उत्तम कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अशोक मोराळे, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक गुन्हे) डॉ. शिवाजी पाटील, गुन्हे प्रकटीकरण 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण अडगळे, सहाय्क पोलीस निरीक्षक दत्तात्रय गरुड, हवालदार संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, पोलीस नाईक अतुल साठे, सुजीत पवार आदी पोलीस पथकाने केली.