दु:खद बातमी बारामतीत 30 वर्षीय पोलिसाची आत्महत्या
बारामती शहरात 30 वर्षीय पोलिसाने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शहरातील पोलीस वसाहतीत सोमवार 11 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली आहे.
तुषार सानप असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. तुषार यांना 15 दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. छोट्या परीच्या आगमनाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत तुषार यांनी आनंद व्यक्त केला होता. पत्नी माहेरी असल्याने तुषार पोलीस वसाहतीतील घरी एकटेच होते. घरी कोणी नसल्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
तुषार यांच्या आत्महत्येची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तुषार हे मनमिळावू व प्रेमळ स्वभावाचे होते. त्यामुळे अनेकांसोबत जिवाळ्याचे नाते होते. तुषारचा मृतदेह पाहून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले.
तुषार हे लॉकडाऊनच्या काळात जबाबदारीने कर्तव्य बजावत होते. सुरुवातीच्या काळात तुषार यांनी बारामती गुन्हे शाखेत कर्तव्य बजावले होते. गेल्या 2 वर्षांपासून ते शहर पोलीस ठाण्यात ते कर्तव्य बजावत होते. तुषार यांनी अचानक आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.