वॉर्डनिहाय पथक स्थापन करून स्वयंसेवी संस्थांनी कोरोनामुक्त मुंबईसाठी प्रशासन व नागरिकांमधील दुवा म्हणून काम करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद
मुंबई, दिनांक ९ : बृहन्मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघरी जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. त्यांनी महापालिकेच्या सहायक आयुक्तांना या वॉर्डनिहाय पथकांची नोंदणी करण्याची सूचनाही दिली.
आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस.चहल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.