बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज अभियानाकडून विशेष उल्लेखनीय पुरस्कार
व्हॉट्सऍप चॅटबोट आणि भौगोलिक माहिती प्रणालीआधारे मुंबईकरांना ‘सभोवताली असलेल्या सुविधां’ ची नकाशाबद्ध माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल पुरस्कार
सूरतमध्ये होणाऱया स्मार्ट सिटीजः स्मार्ट अर्बनायझेशन परिषदेत होणार सन्मान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने व्हॉट्सऍप चॅटबॉट आणि भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System- GIS) यांचा नावीन्यपूर्ण उपयोग करुन मुंबईकरांना ‘सभोवताली असलेल्या सुविधां’ (Discover Amenities Near Me) ची माहिती नकाशाबद्ध पद्धतीने उपलब्ध करुन दिल्याबद्दल व त्या माध्यमातून सामाजिक पायाभूत सुविधांचा नकाशा तयार केल्याबद्दल केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटीज अभियानाकडून विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सूरत येथे दिनांक १८ व १९ एप्रिल २०२२ रोजी होणाऱया स्मार्ट सिटीजः स्मार्ट अर्बनायझेशन या परिषदेत बृहन्मुंबई महानगरपालिकेला हा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित केले जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला हा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध विभागांना विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचा एक भाग म्हणून गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटीज अभियानाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नुकतीच स्पर्धा आयोजित केली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्थानिक जनजीवनासाठी खुबीने वापर करणाऱया शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अर्बन जिओस्पॅशल डेटा स्टोरिज चॅलेज २०२२’ ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘अर्बन सेक्टर – सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मॅपिंग’ या प्रकारात ‘बीएमसी ऑन मॅप ऍण्ड व्हॉट्सऍप चॅटबॉट – डिस्कव्हर ऍमॅनिटीज निअर मी’ या उपक्रमाची प्रवेशिका सादर केली. या उपक्रमास विशेष उल्लेखनीय (Special Mention) पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. ‘स्मार्ट सिटीजः स्मार्ट अर्बनायझेशन’ परिषदेमध्ये महानगरपालिकेच्या प्रतिनिधींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
मुंबईकरांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील उपयोग केला जात आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी जास्तीत-जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करुन नागरी सेवा-सुविधांमध्ये सुलभता आणण्याचे निर्देश प्रशासनाला वेळोवेळी दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा परिपूर्ण उपयोग करण्यासाठी सर्व खात्यांना / विभागांना सूचना देखील केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संचालक (माहिती तंत्रज्ञान) श्री. शरद उघडे व त्यांच्या सहकारी चमूने सातत्याने प्रयत्न करुन नागरिकांसाठी ‘नजीक / सभोवताली असलेल्या सुविधां’ (Discover Amenities Near Me) हा तंत्रज्ञान आधारित पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
अतिशय विस्तीर्ण असलेल्या मुंबई महानगरात आपल्या आजूबाजूला कोणकोणत्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी, त्याचा आवश्यकतेनुसार उपयोग करता यावा, यासाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System- GIS) तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर प्रत्येक नागरिक ‘नकाशे, अंतरंग आणि अहवाल’ (मॅप्स, रिपोर्टस् ऍण्ड इनसाईट्स) या लिंकवर जाऊन ‘नजीक उपलब्ध असलेल्या सोयी व सुविधा’ (निअर मी – फॅसिलिटीज ऍण्ड ऍमिनिज) हा पर्याय निवडू शकतो. त्यामध्ये २०० मीटर ते ५ किलोमीटर परिघातील वेगवेगळ्या सेवा-सुविधांची ठिकाणे आढळतात. महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयांची हद्द, महानगरपालिकेची वेगवेगळी कार्यालये, बसथांबे, बसस्थानक, महानगरपालिकेची रुग्णालये व प्रमुख रुग्णालये, उद्याने, वाहनतळ, शाळा, सार्वजनिक प्रसाधनगृहे, अंत्यसंस्कारांची ठिकाणे अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती नकाशांवर दिसते.
महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून नकाशबद्ध केलेली ही सुविधा महानगरपालिकेचा व्हॉट्सऍप चॅटबॉट क्रमांक ८९९९२२८९९९ यावर देखील उपलब्ध आहे. चॅटबॉट मधील योग्य पर्यायांचा अवलंब करित गेल्यानंतर नागरिकांना आपल्या सभोवताली असलेली नागरी सेवा-सुविधांची माहिती मिळते. व्हॉट्सऍप चॅटबॉटमध्ये देखील सामाजिक / नागरी पायाभूत सुविधांची ही माहिती उपलब्ध झाल्याने भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मुंबईकरांच्या तळहातावर सुलभ व सहज अशी नकाशाबद्ध माहिती सदैव उपलब्ध राहणार आहे. यापुढे देखील महानगरपालिकेच्या अधिकाधिक सेवा-सुविधा मोबाईल ऍप्लीकेशन आणि व्हॉट्सऍप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांच्या सुलभतेसाठी उपलब्ध केल्या जाणार असून, त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती संचालक श्री. शरद उघडे यांनी दिली आहे.