राजुर येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त चोख व्यवस्था ठेवा भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जालना :- भोकरदन तालुक्यातील राजुर येथे दि.19 एप्रिल रोजी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे सुयोग्य नियोजन करण्याबरोबरच परिसरात पाणी, लाईट, स्वच्छतागृह तसेच पार्किंग आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
राजुर (गणपती) येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त पूर्वतयारीची आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मागदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, भोकरदनचे उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार श्रीमती सारिका कदम, पोलीस उपअधीक्षक आय.एम. बहुरे, एम.आर जगताप, महावितरणचे व्ही.आर. गांधले, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.ए. घोडके, प्रशांत दानवे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी राजुर येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. राजुरमध्ये एस.टी. बसेस तसेच येणाऱ्या खासगी वाहनांची संख्या लक्षात घेता वाहनांमुळे कुठेही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी पार्किंग व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात यावे. दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिक गर्दी करत असल्याने या परिसरात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. वीजेच्या खांबावर लटकत्या तारा असतील तर त्याचीही तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिले.
सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने दर्शन रांगेमध्ये भाविकांसाठी पाण्याची तसेच सावलीची व्यवस्था करण्याबरोबरच भाविकांच्या आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य पथक तैनात ठेवण्यात यावे. बसस्टँड तसेच पार्किंग परिसरामध्ये लसीकरण कँपचे आयोजन करण्यात यावे. परिसरात कुठेही आगीची घडना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याबरोबरच अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सुचना करत प्रशासन व विश्वस्त मंडळाने समन्वयाने व एकत्रितरित्या काम करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी दिल्या.