ताजी बातमी

मुंबई | राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर चांगली गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील ३५१ तालुका समित्या आणि २६ हजार ५९ ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

महिला व बालविकास मंत्री मा. आदिती तटकरे यांनी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत या समित्यांचे प्रशिक्षण आणि अभियानाच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, “अभियान केवळ कागदावर न राहता, प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचले पाहिजे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी हे अभियान एक प्रभावी साधन ठरणार आहे.”

मंत्री तटकरे यांनी सांगितले की, ‘#आदिशक्तीअभियान’ हे महिला बचतगटांचे बळकटीकरण, महिला सुरक्षा, न्यायप्रवेश, आरोग्य व पोषण जनजागृती, शैक्षणिक व व्यावसायिक प्रगती, नेतृत्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहूल मोरे, अवर सचिव सुनील सरदार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागाचे आयुक्त, एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे, तसेच छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागांचे विभागीय आयुक्त सहभागी झाले.

राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे महिलांच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार असून, ‘आदिशक्ती अभियान’ हे महाराष्ट्रातील महिलांच्या सबलीकरणाच्या प्रवासातील एक नवे पर्व ठरेल. ????✨

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात