संविधान दिनानिमित्त चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; सामूहिक उद्देशिका वाचनास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई | संविधान दिनाच्या औचित्याने चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी संविधान मूल्यांप्रति निष्ठा व्यक्त केली.
या वेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रविकिरण पाटील तसेच महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे उपस्थित होते.
भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘घर घर संविधान’ या विशेष उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेल्या ‘बीआयटी चाळ’ परिसरातील अभिवादन कार्यक्रमाने दिवसाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आधारित चित्ररथाचे उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सिद्धिविनायक मंदिर, दादर ते चैत्यभूमी या मार्गावर संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत मुंबई शहर व उपनगरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. संविधानिक जागरूकता व सामाजिक समतेचा संदेश देत ही रॅली विशेष आकर्षण ठरली.
संविधान दिनाचे औचित्य साधत घेतलेले हे उपक्रम संविधानाच्या मूल्यांची जपणूक आणि जनजागृतीचा संकल्प अधिक दृढ करत असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.