८ ते ९ डिसेंबरला मुंबईतील १७ विभागांमध्ये १५% पाणीकपात
भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी २७५० मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे महत्त्वाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. हे काम करण्यासाठी अंदाजे २४ तासांचा कालावधी अपेक्षित असून, याचा थेट परिणाम मुंबईतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
या अंतर्गत सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून
मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत
मुंबईतील एकूण १७ प्रशासकीय विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.
कोणकोणत्या विभागात पाणीकपात?
मुंबई शहर विभाग: ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर
पश्चिम उपनगर: एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर उत्तर, आर मध्य
पूर्व उपनगरे: एन, एल, एस
जुन्या जलवाहिनीऐवजी नवीन जलवाहिनी अंथरण्यासाठी हे काम आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
यापूर्वी हे काम ३ ते ४ डिसेंबर रोजी करण्याचे प्रस्तावित होते, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर अनुयायी मुंबईत येत असल्याने गैरसोय टाळण्यासाठी पाणीकपात रद्द करून काम पुढे ढकलण्यात आले होते.
नागरिकांसाठी महापालिकेचे आवाहन
या कालावधीत नागरिकांनी
पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा,
पाणी जपून वापरावे,
आणि आवश्यक ते महापालिकेच्या कामास सहकार्य करावे,
असे आवाहन प्रशासनाने केले आहे.