कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी सर्वांगिण तयारीस जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन संपूर्ण नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांची सुरक्षितता, सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन यांना प्राधान्य देत सर्व विभागांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप गिल्ल, पोलीस सह आयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, पीएमपीएल, आरोग्य विभाग, पंचायत राज संस्था आणि अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी विजयस्तंभ परिसरातील डागडुजी, दुरुस्ती, फुलांची सजावट, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुरक्षा उपायांची कामे प्राथमिकतेने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वाहतुकीच्या वाढत्या दडपणाला सामोरे जाताना मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन, छोटे वाहन व दुचाकींसाठी वेगळे पार्किंग, तात्पुरती पार्किंग व्यवस्था, तसेच प्रवेश-निर्गमन मार्गांची स्पष्ट आखणी करून दिशादर्शक फलक लावण्याची सूचना करण्यात आली.
अनुयायांच्या सोयीसाठी पायी येणाऱ्यांसाठी सुरक्षित पथ, सावली, पिण्याचे पाणी आणि विश्रांती सुविधा ठेवण्यावर भर देण्यात आला. महिला अनुयायांसाठी स्वतंत्र मार्ग, हिरकणी कक्ष आणि स्वच्छता सुविधा उभारण्याचे निर्देशही देण्यात आले. कार्यक्रमादिवशी मोठी गर्दी लक्षात घेता मोबाइल शौचालये, स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, कचरा संकलनासाठी विशेष पथके व डम्परची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले.
आरोग्य विभागाला प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर-नर्सिंग स्टाफ, औषधे, आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सतत ठेवण्यास सांगितले. सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेरे, 24x7 नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा, राज्य राखीव पोलीस दल, आपत्कालीन पथके, अग्निशमन दल आणि गर्दीवर ड्रोनद्वारे देखरेख यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
अनुयायांच्या सुविधा वाढवण्यासाठी बार्टीतर्फे बुक स्टॉल, माहिती केंद्र आणि मार्गदर्शनासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे.
विजयस्तंभ अभिवादन दिन हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने परस्पर समन्वयाने आणि गतिमान पद्धतीने काम करून अनुयायांना सुरक्षित, सुरळीत आणि सन्मानपूर्वक वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.