डिजिटल आरोग्य व्यवस्थेकडे मोठी झेप; ४,५३७ रुग्णालयांत २,३९९ मोफत उपचारांचा शुभारंभ
मुंबईतील विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील ४ हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २ हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीएमएस २.० प्रणालीमुळे रुग्णांना जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही सेवा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रुग्ण नोंदणीपासून उपचार पूर्ण होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार असून बायोमेट्रिक नोंदणी, उपचार मंजुरीचे डिजिटल ट्रॅकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तक्रार निवारण यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, डॉ. पंकज भोयर, योगेश कदम तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. योजनेअंतर्गत कोणतीही फसवणूक झाल्यास १५५३८८ व १८००२३३२०० या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.