आदिवासी विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहीम
पालघर : उत्तुंग शिखर पार करण्यासाठी लागणारे विलक्षण धैर्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अशा विविध कसोटय़ांवर यशस्वी ठरलेले राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांतील ११ आदिवासी विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पथकात पालघरमधील एका विद्यार्थ्यांचा समावेश असून नुकतेच काठमांडू येथे हे पथक रवाना झाले.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य २०१९’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत असून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहय़ाद्री अतिथिगृह येथे ५ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दुर्गम भागात राहून जगण्याच्या आव्हानांना पेलणारे आदिवासी विद्यार्थी मुळातच शारीरिक आणि मानसिकरीत्या खंबीर असतात. या आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी तयार करतानाच शिस्तबद्ध प्रशिक्षणाची जोड देत त्यांच्यात नेतृत्व कला रुजवावी, आयुष्याकडे सकारात्मकरीत्या बघण्याचा दृष्टिकोन द्यावा आणि भविष्यात देशासाठी आदर्श संघटक घडावेत या उद्देशाने आदिवासी विकास विभागातर्फे ‘मिशन शौर्य’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी पाच आदिवासी विद्यर्थ्यांनी एव्हरेस्ट सर करीत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
या वर्षी मोहिमेच्या दुसऱ्या पर्वात पालघरसह मेळघाट, धुळे, पांढरकवडा, नाशिक येथील आदिवासी पाडय़ावरील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुन्ना धिकार, शिवचरण भिलावेकर, सुग्रीव मंदे, सुषमा मोरे, अंतुबाई कोटनाके, सूरज आडे, मनोहर हिलीम, चंद्रकला गावित, हेमलता गायकवाड, केतन जाधव, अनिल कुंदे हे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे मिशन शौर्य मोहिमेत देवगावच्या माधवराव काणे आश्रमशाळेचा आदिवासी विद्यार्थी केतन जाधव या विद्यार्थ्यांचीही एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड करण्यात आली आहे. एव्हरेस्ट चढाईपूर्वीचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत केतनची अंतिम पथकात निवड झाली. केतनचे कुटुंबीय शेळीपालनाचा व्यवसाय करतात. मात्र केतनने आयुष्यात मोठे यश संपादित करावे अशी त्याच्या पालकांचीही इच्छा आहे. केतन अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांमध्येही पारंगत आहे, त्यामुळे एव्हरेस्ट मोहीम स्वत:च्या वेगळ्या कौशल्याने पूर्ण करेल, अशी आशा वाटते, असे माधवराव काणे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुरेश गोतारणे यांनी सांगितले.
एव्हरेस्ट चढाईसाठी आवश्यक असलेल्या साहसाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी वर्धा येथील ज्ञानभारती कुशल विकास केंद्रामध्ये मूलभूत प्रशिक्षण देण्यात आले. या केंद्रात २०३ विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यातून निवड झालेल्या १३२ विद्यार्थ्यांना हैदराबादमधील भोंगीर येथे रॅपलिंग आणि रॉक क्लायम्बिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात उत्कृष्ट ठरलेल्या ४१ विद्यार्थ्यांची निवड दार्जिलिंगमधील हिमालयन माउंटनरिंग इन्स्टिटय़ूट येथील प्रशिक्षणासाठी करण्यात आली. वीस दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सिक्कीममध्ये हिमालयन सेंटर फॉर अॅडव्हेंचर या ठिकाणी खडतर प्रशिक्षण देण्यात आले. या संपूर्ण प्रशिक्षणाअंती कायम उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ११ विद्यार्थ्यांची निवड मोहिमेसाठी करण्यात आली .