सागरी किनारा मार्गाचे काम रोखले!
प्रस्तावित सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्याचे काम तूर्त करू नये असे बजावूनही ते सुरूच ठेवल्याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर प्रकल्पासाठी समुद्रात टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह सागरी किनारा मार्गाचे बांधकाम थांबवावे आणि परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, असे आदेश देत न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला धक्का दिला.
प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे सागरी किनाऱ्याचे आणि सागरी जैवविविधतेचे जेवढे नुकसान व्हायचे तेवढे झाले आहे. परंतु ज्या परिसरात भराव टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते तूर्त करू नये, असे असे तोंडी आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी पालिकेला दिले होते. पालिकेनेही हे काम केले जाणार नसल्याची हमी न्यायालयाला दिली होती. त्यानंतरही भराव टाकण्याचे काम सर्रास सुरू असल्याची आणि त्यामुळे प्रत्येक दिवशी सागरी जैवविविधतेला धोका पोहोचत असल्याची बाब या प्रकल्पाविरोधातील विविध याचिकाकर्त्यांनी मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.