ताजी बातमी

बारच्या मालकीवरून १४ वर्षांपूर्वी कल्याणमध्ये झालेल्या हत्येतील आरोपी कुख्यात गुंड फजल उर रहेमान उर्फ फजलू उर्फ डॉक्टर उर्फ अली बशीद अली शेख याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने गुजरातच्या साबरमती कारागृहातून ताब्यात घेतले आहे. फजलूविरुद्ध महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहारमध्ये खून आणि अन्य असे एकूण २७ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. दाऊद टोळीसाठी काम करणाऱ्या बबलू श्रीवास्तवचा फजलू उजवा हात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

धुरू बार अँड रेस्टॉरंटच्या जागेवरून बारचालक राकेश रमण राय उर्फ राकेश शेट्टी आणि हरिश जवाहरलाल वझराणी यांच्यात वाद होता. हरिश याचा भाऊ मनोहर याच्या मालकीचा असलेला हा बार राकेश हडप करण्याच्या तयारीत असल्याने राकेशच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यासाठी फजलू रहेमान, उदय शेट्टी, राजू भाई यांना राकेशच्या हत्येची २० लाखांची सुपारी दिली होती. नंतर फजलू रहेमान टोळीच्या सदस्यांनी गोळीबार करत राकेशची २००५मध्ये हत्या केली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी हरिश आणि सुनील शिवण्णा शेट्टी रा. कल्याण या दोघांना पोलिसांनी अटक केले होते. तर टोळी प्रमुख फजलू फरार होता. मात्र गुजरातच्या अहमदाबादमधील डीसीबी पोलिस ठाण्यात दाखल आलेल्या गुन्ह्यात फजलू साबरमती कारागृहात मागील काही वर्षांपासून होता. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या ठाणे खंडणीविरोधी पथकाने ट्रान्सफर वॉरंटद्वारे अहमदाबादमधील न्यायालयातून आरोपीला ताबा घेऊन ठाण्यात आणले. फजलू याला न्यायालयाने १३ मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात