दुधासाठी प्लास्टिक बाटल्या?
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांतील उत्पादकांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांअंतर्गत पॅकेज दुधासाठी पेट बाटल्यांचा वापर करण्याचा विचार महाराष्ट्र दूध उद्योगातील महत्त्वाचे उद्योजक करीत आहेत. दूध काढून घेतल्यावर पिशव्या स्वच्छ धुवून व वाळवून जपून ठेवणे ग्राहकाला शक्य होत नाही. तसेच या पिशव्या गोळा करण्यासाठी अतिरिक्त निधी गरजेचा असल्याने दूध वितरणासाठी प्लास्टिक पिशव्यांऐवजी प्लास्टिकच्या पेट बाटल्यांचा पर्याय योग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या पेट बाटल्यांसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक जागतिक दर्जाचे आणि पुनर्वापरायोग्य आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या तुलनेत बाटल्या गोळा करणे सोपे आहे. उद्योग जगतातील अंदाजानुसार भारतात पेट बाटल्यांचा पुनर्वापर करण्याचे प्रमाण टेट्रापॅक/खोकी (५ ते ३०%), काचेच्या बाटल्या (४५%) यांच्या तुलनेत अधिक आहे. अंदाजे ८० टक्के पेट बाटल्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. त्यामुळे या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे.