‘लंचटाइम’ आता अर्ध्या तासाचाच
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 'लंचटाइम’ आता अर्ध्या तासाचाच असणार आहे. दुपारच्या जेवणासाठी दुपारी एक ते दोन वाजता अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. खात्यातील सर्वच जणांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसेच मुंबईबाहेरच्या शासकीय कार्यालयांमधील लंचटाइम ऑगस्ट १९८८ मध्येच निश्चित करण्यात आला होता. दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची वेळ निश्चित केली आहे. तर १८ सप्टेंबर २००१ च्या शासन परिपत्रकाद्वारे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन या वेळेत जास्तीत जास्त अर्ध्या तासाची जेवणाची वेळ निश्चित केली आहे. पण मंत्रालयाव्यतिरिक्त इतर राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाची वेळ निश्चित नव्हती. त्यामुळे जनतेशी थेट संबध असलेल्या कार्यालयांमध्ये सर्वसामान्य लोक तक्रारी व गाऱ्हाणी घेऊन येतात, तेव्हा बऱ्याच वेळेस अधिकारी व कर्मचारी जागेवर उपलब्ध होत नाहीत.