रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
मुंबई
: बेस्टकडून भाडेकपातीचा निर्णय घेतला जात असतानाच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ मात्र होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायतीची बैठक पार पडली. यात टॅक्सी संघटनांनी २५ रुपये भाडेवाढीची मागणी केली. येत्या मंगळवारी भाडेवाढीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
गेल्या तीन वर्षांत टॅक्सीच्या भाडय़ात वाढ झालेली नाही. परंतु सीएनजीच्या दरात ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत पाच वेळा झालेली वाढ पाहता मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने ३० रुपये भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे.
परिवहन विभागाने सध्या भाडेवाढीवर चर्चेसाठी टॅक्सी संघटनांना आमंत्रित केले आहे. अद्याप रिक्षा संघटनांना बोलावणे आले नसल्याचे ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले. चार ते सहा रुपयांपर्यंत भाडेवाढ न मिळाल्यास ९ जुलैपासून रिक्षा चालक-मालक संघटनांनी बेमुदत संपाचा इशाराही दिला आहे. मात्र रिक्षांच्या भाडेवाढीवरही लवकरच चर्चा होणार असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले.