पनवेल: कामोठ्यात कारच्या धडकेत २ ठार, पाच जखमी
कामोठे इथं भरधाव वेगातील कारनं सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. सार्थक चोपडे (वय ७) व वैभव गुरव (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
कामोठ्यातील सेक्टर सहामधील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरच्या रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा भयंकर प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या एका स्कोडा कार काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या चार दुचाकी, पादचारी व स्कूल बसला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, साधना चोपडे (वय ३०), श्रध्दा जाधव (वय ३१), शिफा (वय १६), आशिष पाटील (२२) आणि प्रशांत माने हे चार जण जखमी झाले. त्यांना तात्काळ कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.