वसईत पावसाचा बळी; १४ वर्षीय मुलगा वाहून गेला
पालघर: मुंबई लगतच्या वसई परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून पुराच्या पाण्यात एक मुलगा वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पावन प्रजापती असे या १४ वर्षीय मुलाचे नाव असून तो मोरी या गावातील रहिवासी आहे. दरम्यान, पालघर आणि राज्यातील इतर ठिकाणी पावसाचा जोर कायम असून, गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. मुसळधार पावसामुळे वसई परिसरातील कामण, नागले आणि मोरी गावात पुरसदृश्च परिस्थिती निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातही संततधार सुरू असून ठाण्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास, भातसा आणि बारवी नदयांना पूर आला असून या नद्यांच्या आसपासच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याच प्रमाणे खडवलीजवळ भातसा नदीला आलेल्या पुरात एकूण ३५ नागरिक अकडकल्याचे वृत्त आहे.