सायन रुग्णालय पुनर्विकास प्रस्ताव परत पाठवला
सायन रुग्णालय पुनर्विकासा प्रस्तावात तांत्रिक उणिवा असल्याचा दावा करत सोमवारी हा प्रस्ताव स्थायी समितीने प्रशासनाकडे परत पाठवला. आज, मंगळवारी हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. या पुनर्विकासासाठी सुमारे ६७२.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. नर्सिंग कॉलेज, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत तसेच निवासी डॉक्टरांसाठीच्या इमारतींचा यामध्ये समावेश आहे. अहलुवालिया कॅान्ट्रक्ट (इंडिया) या कंपनीला हे काम देण्यात आले असून कंपनीने पालिकेने अंदाजित खर्चापेक्षा १० टक्के जादा दराने हे काम मिळवले आहे. त्यास विरोधीपक्षाने हरकत घेतली आहे. पालिकेने कंत्राटदारासोबत आणखी वाटाघाटी करून कंत्राट दर कमी करावेत, अशी सूचना नगरसेवकांनी स्थायी समितीत केली. त्यानंतर हा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.