छोटा राजनच्या भावाची उमेदवारी रद्द
मुंबई : रिपब्लिकन पक्षाने छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फलटणमधून बुधवारी जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली. त्यांच्या जागी आता दिगंबर आगाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमधून विरोध होत झाल्याने निकाळचे यांना उमेदवारी नाकारल्याचे समजते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला भाजपने सहा जागा सोडल्या आहेत. आठवले यांनी त्यापैकी चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले होते. पक्षाचे उपाध्यक्ष असलेले दीपक निकाळजे यांना फलटणमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र गुरुवारी ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करून आगाव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
मानखुर्द-शिवाजीनगरमधून पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याशिवाय आमदार मोहन फड (पाथरी), राजेश पवार (नायगाव), अरविंद भालाधरे (भंडारा) व डॉ. विवेक गुजर (माळशिरस) अशी रिपब्लिकन पक्षाच्या अन्य उमेदवारांची नावे आहेत.