ताजी बातमी

औरंगाबाद,  : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या राम नगरात प्रशासनाने मोठ्याप्रमाणात केलेल्या जनजागृतीने या भागातील कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग मंदावल्याचे सहायक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.


शिवाय या भागातील 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. यामध्ये या परिसरातील 191 व्यक्ती या 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आढळलेल्या आहेत. त्यांच्यावर विशेष लक्ष प्रशासनामार्फत ठेवण्यात येते आहे. त्यांच्यापैकी एखाद्यास कोरोनाची लक्षणे आढळली, की तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून संभाव्य धोका टाळण्यासाठीची सर्व पावले उचलल्याचेही ते म्हणाले.    


सुरूवातीपासून आतापर्यंत 58 कोरोनाबाधित या परिसरात आढळले. त्यापैकी 43 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. एका जणाचा मृत्यू झाला तर उर्वरीत 14 जणांवर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून खूप मोठ्याप्रमाणात जनजागृतीसह सामाजिक कार्य या भागात होत आहे.  परिसरात कोरोनाबाधित आढळल्यानंतर लागलीच प्रवेश करण्याची ठिकाणे, गल्ल्या पूर्णपणे सील करण्यात येतात. या भागातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची उपलब्धता जसे, की दळण, भाजीपाला, औषधींची उपलब्धता स्वयंसेवक, लोक प्रतिनिधी यांच्या साह्याने करून दिली आहे. तसेच या भागातील सर्व नागरिकांना, 'घरातच थांबा, सुरक्षित राहा' हा जीवनावश्यक मंत्र त्यांच्या मनात बिंबवला आहे. लोकांनाही ते पटल्याने या भागातील होणारी हालचाल नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.


राम नगरात बरे होऊन परत आलेल्या रुग्णांना प्रशासनाच्या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केलेले आहे. परिसरातील नागरिकांनीही त्यांचे स्वागत केले आहे. आरोग्य विषयक देण्यात आलेला सल्ला काटेकोरपणे पाळावा,अशी विनंतीही त्यांना करण्यात आलेली आहे, असेही ते म्हणाले.   


राम नगर भागातीलच 40 वर्षीय बाळासाहेब कुळकर्णी म्हणाले, प्रशासनाने वेळीच लक्ष ‍दिल्याने परिसरात कोरोनाचा होणारा संभाव्य विस्फोट नियंत्रणात येण्यास मदत झाली. अन्यथा आतापर्यंत 150 ते 200 कोरोनाबाधित रुग्ण या  परिसरात आढळली असती. परंतु श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेळीच उत्तमरित्या कामगिरी केलेली आहे. त्यांनी येथे ठाण मांडून बसल्याने व उपाययोजना केल्याने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली आहे.


विनाकारण गप्पा मारणे, मास्क वापर न करणे, मोकळ्या मैदानात कपडे वाळविण्यासाठी येणे, दुकाने सुरु असणे असे प्रकार पूर्वी होत. परंतु पथकाची नियुक्ती करण्यात आली, तेव्हापासून या सर्व बाबींवर आळा बसला. त्यातूनच कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत झाली आहे. प्रशासन प्रयत्न करत आहे, त्यांना लोकांनी साथ देणे आवश्यक असल्याचेही श्री. कुलकर्णी म्हणाले.


याच  परिसरातील अतुल घडमोडे म्हणतात, पोलिस, आरोग्य विभागाच्यावतीने  येथील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करण्यात येते आहे. चौका चौकात जाऊन मेगाफोनच्या माध्यमातून कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी, खबरदारी याबाबत वारंवार सूचना करण्यात येत आहेत. एकूणच पथकाची कामगिरी उत्तम असल्याने राम नगरातील कोरोनच्या प्रसाराची साखळी तुटण्यास मदत झाल्याचेही श्री. घडमोडे म्हणाले.      


श्री. शिंदे यांच्या नियंत्रणाखालील पथकात सह समन्वय अधिकारी म्हणून अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे  प्रवीण पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सुरे, मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आर.एन. संदा, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता कराड, दुय्यम आवेक्षक मधुकर चौधरी आदींचा समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात