ताजी बातमी

रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविली जात असून, रुग्णालय परिसरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कचरा वर्गीकरण व संक्रमण नियंत्रणावर विशेष भर देण्यात येणार आहे.

मोहिमेत रुग्णालयातील वार्ड, कार्यालये, वसतिगृहे, स्टोअर व कँटीन परिसराची स्वच्छता, कीटकनियंत्रण, शून्य राडारोडा आणि भंगार निर्मूलनाची कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन, परिरक्षण, उद्यान आणि अतिक्रमण विभागांचाही समन्वय राहणार आहे.

मोहिमेदरम्यान रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छता जनजागृती कार्यक्रम, शपथविधी व सहभाग उपक्रम आयोजित केले जातील. मोहिमेनंतर सर्व रुग्णालयांचे मूल्यांकन होऊन स्वच्छता, नवकल्पना आणि सार्वजनिक सहभाग या निकषांवर उत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

स्वच्छ आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे यांनी सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात