मराठी मातीतील कमांडोने गाजवले शौर्य
लातूर जिल्ह्यातील अहमदपूरसारख्या छोट्या गावात शिकलेल्या शिरीषला डॉक्टर असलेल्या वडिलांनी सातारा सैनिकी शाळेत पाठवले. तेथून त्याची एनडीएमध्ये सर्वांत कठीण असलेल्या नौदलासाठी निवड झाली. पण नौदलात राहून आलिशान अशा 'क्रुझ' श्रेणीतील नौकेवर जाण्याची शिरीषची इच्छाच नव्हती. त्याला काहीतरी वेगळे 'डेअरडेव्हिल' करायचे होते. त्यासाठी त्याने कमांडो होण्याचे ठरवले. कमांडो म्हणून सेवा देतानाच शौर्य गाजविल्याबद्दल लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले या मराठमोळ्या तरुण अधिकाऱ्याला बुधवारी नौसेना पदकाने सन्मानित करण्यात आले.
लेफ्टनंट कमांडर शिरीष शिवनाथ पावले हे नौदलात कमांडो पथकाचे (मार्कोस) नेतृत्व करतात. कमांडोंना अतिशय कठीण परिस्थितीत व प्रसंगी समुद्राच्या आतूनही हल्ला करावा लागतो. अशा पथकाचे नेतृत्व करतानाच पावले यांना हिंदी महासागरात चार चाच्यांनी एक व्यापारी जहाज ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. हे जहाज त्या चाच्यांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पावले यांच्या पथकाने दोन दिवस कसून सराव केला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात जहाजावर हल्ला चढवला. चोख कारवाईमुळे हादरलेल्या चारही सशस्त्र चाच्यांनी चकमकीदरम्यान शरणागती पत्करली. याबद्दल लेफ्टनंट कमांडर पावले यांना बुधवारी येथील आयएनएस शिक्रा तळावरील कार्यक्रमात नौदल प्रमुखांच्या हस्ते पदक मिळाले.